अहमदाबाद विमान दुर्घटनेची धक्कादायक माहिती उघड पायलटनेच इंधन स्विच बंद केल्याचा संशय

0
2

दि.१२(पिसीबी):गेल्या वर्षी जून 2025 मध्ये घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट 171 च्या भीषण विमान दुर्घटनेबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. या अपघातामागे तांत्रिक बिघाड नसून कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विच जाणीवपूर्वक बंद केल्यामुळे दुर्घटना घडली असावी, असा दावा इटलीतील कोरिएरे देल्ला सेरा या वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यासाठी वृत्तपत्राने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनदरम्यान झालेल्या चर्चांशी संबंधित दोन सूत्रांचा हवाला दिला आहे. मात्र भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही.

या दुर्घटनेत एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. विमान एका वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर पडल्याने जमिनीवरील लोकांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत फक्त एक प्रवासी जीवंत बचावला होता.

प्राथमिक अहवालातील निष्कर्ष:

जुलै 2025 मध्ये भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, उड्डाणानंतर काही क्षणांतच विमानातील फ्युएल कंट्रोल स्विच ‘RUN’ वरून ‘CUT-OFF’ स्थितीत हलवण्यात आले होते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्याला “तू इंधन का बंद केलं?” असा प्रश्न विचारताना ऐकू येतो, त्यावर दुसरा पायलट “मी नाही केलं” असे उत्तर देतो.

संशयाचा केंद्रबिंदू कॅप्टन यांच्याकडे

इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार तपास अधिकाऱ्यांना वाटते की विमानाचे कमांडर कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी स्विच बंद केले असावेत, ज्यामुळे इंजिन बंद पडून विमान कोसळले. सहपायलट क्लाइव्ह कुंदर होते. मात्र जबाबदाऱ्या अद्याप स्पष्ट नसल्याचेही वृत्तात नमूद आहे. तसेच कॅप्टन सभरवाल यांना नैराश्याचा त्रास होता, असा संशय तपासात व्यक्त झाल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे.

कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुलाच्या मानसिक स्थितीबाबतच्या अफवांनाही त्यांनी ठामपणे नकार दिला आहे.

ब्लॅक बॉक्स डेटावर आधारित प्राथमिक तांत्रिक विश्लेषणात यांत्रिक बिघाडाची शक्यता नाकारण्यात आली होती. तपासात आढळले की डाव्या बाजूचे इंजिन आधी बंद झाले आणि नंतर उजवे. कॅप्टन डाव्या बाजूला बसलेले असतात. शेवटच्या क्षणी सहपायलटने विमान उंचावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॅप्टनच्या कंट्रोल स्टिकमध्ये हालचाल आढळली नाही.

अंतिम तपास अहवालात पायलट्सच्या सतत मानसिक आरोग्य तपासणी आणि मानसशास्त्रीय मूल्यांकनाबाबत शिफारसी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, अधिकृत अंतिम अहवाल येईपर्यंत या दाव्यांना अधिकृत पुष्टी नसून तपास सुरू असल्याचेच अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.