हैदराबाद ,दि. २८ (पीसीबी) : – AIMIM चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हैदराबादचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मजरुद्दीन अली खान असे त्यांचे नाव असून, सोमवारी त्यांच्या राहत्या घरी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मजरुद्दीन यांनी मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मजरुद्दीन खान (वय ६०) हे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दुसऱ्या मुलीचे सासरे होते. त्यांनी त्यांच्या बंजारा हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
खान यांनी त्यांच्या कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीने गोळी झाडली. सोमवारी खान हे घरी एकटेच होते. त्यांच्या नतेवाईकांनी त्यांच्याशी फोन वरून संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे नातेवाईकांना संशय आल्याने ते त्यांच्या घरी गेल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.