असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार – सुनील शिंदे

0
193

असंघटित कामगार काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सुंदर कांबळे यांची निवड

शितल कोतवाल यांची राज्य महिला समन्वयक पदी निवड

पिंपरी, दि. 28(पीसीबी) कामगार क्षेत्राकडे मागील नऊ वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष करून भांडवलदारांना उपयोगी ठरणारे कायदे केले आहेत. असंघटित कामगारांना तर किमान वेतन देखील दिले जात नाही. देशात पंधरा कोटी आणि राज्यात अडीच कोटी पेक्षा जास्त असंघटित कामगारांची संख्या आहे. या दुर्लक्षित समाज घटकाचा विकास करण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर असंघटित कामगार काँग्रेस काम करीत आहे. राज्यातील कोट्यावधी असंघटित कामगारांना किमान वेतन देखील दिले जात नाही. यासाठी रस्त्यावर उतरून राज्यभर लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले.

शनिवारी (दि.२७) पिंपरी येथे पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांचा मागील पाच वर्षातील कामाचा आढावा घेऊन त्यांची शहराध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. तसेच शितल कोतवाल यांची राज्य महिला समन्वयक पदी निवड केल्याचे जाहीर केले.

यावेळी सुनील शिंदे यांच्या हस्ते संघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये घरेलू महिला कामगार काँग्रेस महिला अध्यक्ष वंदना आराख, ऑटो रिक्षा चालक-मालक समन्वयक अझहरभाई पुणेकर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रमेश गोरखा, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रदीप कांबळे, पिंपरी विधानसभा घरेलू कामगार महिला काँग्रेस अध्यक्ष वृषाली कदम, भोसरी विधानसभा अध्यक्ष राकेश लद्धे, घरेलू महिला कामगार काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष निकिता बोराटे, शहर महिला उपाध्यक्ष स्वाती जाधव, सोशल मीडिया समन्वयक स्नेहल मनोहर, उपाध्यक्ष फातिमा शेख, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष अंजू खन्ना, कार्यालयीन सचिव प्रिती ओहोळ, सोशल मीडिया सुरेखा गायकवाड, प्रभाग क्रमांक १९ अध्यक्ष कृष्णा यादव, शहर उपाध्यक्ष हनुमंत कांबळे आदींचा समावेश आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष दिलीप पांढरकर, वकील सेलचे शहराध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांच्यासह असंघटित कामगार बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील शिंदे यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील “डिलिव्हरी बॉय” यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा प्रकारचे महामंडळ राजस्थान राज्यात अस्तित्वात आहे. पुणे पिंपरी चिंचवड सह राज्यात अनेक ठिकाणी मेट्रो सारख्या विविध विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. अशा राज्य व केंद्र सरकारच्या प्रकल्पात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना किमान वेतन दिले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी तसेच इतर विविध विभागात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी राज्यभर लढा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतून करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी संघटनेत सहभागी व्हावे तसेच “ई श्रम कार्ड” नोंदणी करून घ्यावी असेही आवाहन यावेळी सुनील शिंदे यांनी केले. प्रास्ताविक सुंदर कांबळे, सूत्रसंचालन प्रदीप कांबळे, स्वागत शितल कोतवाल, आभार अझरुद्दीन पुणेकर यांनी मानले.