दि.१४ (पीसीबी)-श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे/पाचारणे यांनी ३९ वर्षांच्या यशस्वी आणि भरीव शिक्षकी सेवेनंतर आज सेवानिवृत्ती घेतली. अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात त्यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
शिक्षकी पेशासोबतच समाजकार्याचा ध्यास घेतलेल्या सोनवणे मॅडम यांनी ९८ वेळा रक्तदान करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. त्या महिला बचत गट अध्यक्षा, पर्यावरण संवर्धन समिती टीम लीडर, पोलीस नागरिक मित्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्यवाह, स्काऊट गाईड जिल्हा सहाय्यक आयुक्त, इंद्रायणी को-ऑप बँकेच्या संचालिका, तक्षशिला अनाथआश्रम संचालिका, अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
त्यांच्या कार्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी १२९ महिलांना मोफत टू-व्हीलर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर उभं केलं. त्याचबरोबर, नेत्रदान व देहदानाचे फॉर्म भरून ठेवत त्यांनी सामाजिक जाणीवेचे एक आदर्श उदाहरण सादर केले आहे.आज त्या फोर स्टेज कॅन्सरशी खंबीरपणे लढा देत असूनही, भविष्यात आदिवासी भागात जाऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणकार्य सुरू ठेवण्याची त्यांची दृढ इच्छा आहे. तसेच, पर्यावरण, रक्तदान आणि अवयवदान या क्षेत्रातही अधिक कार्य करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन नॅशनल, इंटरनॅशनल, राज्यस्तरीय पातळीवर ५०० पेक्षा अधिक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. विशेषतः स्काऊट-गाईड क्षेत्रात त्यांनी लंडन, स्वीडन, जपान, कोरिया अशा विविध देशांत प्रतिनिधित्व करून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
सेवापूर्ती समारंभात श्री जैन मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. राजेंद्र मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमार कांकरिया, प्राचार्या सौ. सुनीता नवले, उपप्राचार्य श्री अनिल गुंजाळ, सर्व पर्यवेक्षक व शिक्षकवृंद, पोलीस अधिकारी, बँक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कविमंच व साहित्य संस्थांचे प्रतिनिधी, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षिका श्रीमती मनिषा कलशेट्टी, सौ. स्मिता सोनवणे व सौ. वंदना पाटील यांनी केले.श्रीमती अंजू सोनवणे यांना शाळा व समाजाच्या वतीने भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या सेवेचा आणि समाजकार्यातील योगदानाचा प्रेरणादायी ठसा कायम स्मरणात राहील, हे निश्चित.