“अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस.

0
176

पिंपरी,दि. १४(पीसीबी) “अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ असते; आणि सानेगुरुजी म्हणजे या संस्कृतीचे संचित होय!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवार, दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शब्दधन काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ती राधाबाई वाघमारे यांना (श्यामची आई) आणि त्यांचे सुपुत्र उद्योजक प्रवीण वाघमारे यांना (श्याम) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

टाटा मोटर्समधील निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह उद्धव कानडे यांची प्रमुख अतिथी आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची स्वागताध्यक्ष म्हणून सोहळ्यात उपस्थिती होती. अभियांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. भरत पाडेकर (सानेगुरुजी विचारसाधना), श्रीरामपूर येथील सुनीता नागरे आणि केंदूर (तालुका शिरुर) येथील संदीप वाघोले यांना (सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा) तसेच निवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांना (सानेगुरुजी संस्कारक्षम शिक्षिका) पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच पद्मश्री नारायण सुर्वे दिवाळी अंक स्पर्धा २०२२ मधील ‘साहित्य स्वानंद’ , ‘शुभम्’ आणि ‘नदी’ (बालसाहित्य) या विजेत्या अंकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी मनोहर पारळकर यांनी, “संस्कार आणि शिक्षण या दोन गोष्टी आता भिन्न होत आहेत!” अशी खंत व्यक्त केली. उद्धव कानडे यांनी आपल्या स्वतःच्या, सुहृदांच्या आणि अन्य महापुरुषांच्या आईविषयी आठवणींना उजाळा देताना, “आईच्या पदराइतके जगात काहीच सुंदर नाही!” अशी भावना व्यक्त केली. पुरस्कारार्थींच्या वतीने डॉ. भरत पाडेकर यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून, “श्याम आणि श्यामची आई यांच्या जीवनात अनेक वैज्ञानिक संकल्पना आढळून येतात!” असे मत मांडले. पुरुषोत्तम सदाफुले आणि मानसी चिटणीस यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुरस्कारार्थींशी संवाद साधला असताना, “कष्टाला पर्याय नाही!” असे प्रवीण वाघमारे आणि “कोणतीही धार्मिक कर्मकांडे न करताही प्रपंचात खूप प्रगती झाली!” असे राधाबाई वाघमारे यांनी सांगितले.

याप्रसंगी पंतप्रधान श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘आईच्या संस्कारांतून घडलेले सानेगुरुजी’ या विषयावर व्याख्यान देताना, “सानेगुरुजी यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक आपल्या अश्रूंची शाई करून लिहिले!” असे प्रतिपादन केले. पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या श्रद्धा झिंजुरके या विद्यार्थिनीने वृक्षाला पाणी घालून आणि वर्षा बालगोपाल यांनी ‘खरा तो एकचि धर्म’ ही सानेगुरुजींची कविता सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुदाम भोरे यांनी शुभेच्छा दिल्या. जयवंत भोसले, राजेंद्र वाघ, सुप्रिया सोळांकुरे, प्रकाश घोरपडे, संगीता झिंजुरके, अरुण गराडे, तानाजी एकोंडे, मधुश्री ओव्हाळ, मुरलीधर दळवी, धनंजय सोलंकर, शामराव सरकाळे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.