अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार ?

0
189

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. हे धक्के अजून पचलेले नसतानाचा आज काँग्रेसमधील आणखी एक वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. नार्वेकर-चव्हाण यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र ना अशोक चव्हाण ना भाजपचे इतर नेते, कोणीही यावर स्पष्ट भाष्य केले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा नेमका मनसुबा काय यावर विविध तर्क लावण्यात येत होते. त्यानंतर दुपारी अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच गदारोळ माजला. महाराष्ट्र काँग्रेसमधील या मोठ्या भूंकंपानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले.

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांचं पुढंचं पाऊल काय असेल याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. काल भाजपची राज्यसभेची यादी जाहीर झाली होती. उत्तर प्रदेशापासून ते पश्चिम बंगालपर्यंतच्या उमेदवारांची नावे त्यात घोषित करण्यात आली होती. पण महाराष्ट्रातील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. चव्हाण हे भाजपमध्ये येणार असल्यामुळेच भाजपने महाराष्ट्रातील यादी जाहीर केली नसल्याची आता चर्चा आहे. आज संध्याकाळपर्यंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतरच भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील बंगल्यावर शुकशुकाट
नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना देखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिल्याची माहिती नाही. त्यांच्या नांदेड येथील निवस्थानी शुकशुकाट पहायला मिळत आहे.