मुंबई, दि. २ (पीसीबी) : गणेशोत्सवातील गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या-उभ्या भेट झाली असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता की कुलकर्णी यांनी समन्वयानं भेट घडवून आणली अशी चर्चा देखील रंगली होती.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील फाटाफूट समोर आली होती. काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण 12 मतं फुटली. काँग्रेसची 6 मतं फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली होती.