अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा

0
47

नांदेड, दि. 16 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नुकताच झालेला महा पराभवाचा आढावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे घेतला. काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा भानुदास माळी यांच्या नेतृत्वात नांदेडचे भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड सह महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकारी यासाठी बोलावण्यात आले होते.

राजस्थानमध्ये जयपूर येथे देशाचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा 8 डिसेंबर रोजी दौरा होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महा पराभवाच्या संदर्भात चर्चा व आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भानुदास माळी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागातून व विविध क्षेत्रातील मोजके पदाधिकारी बोलावण्यात आले होते.या पदाधिकाऱ्यात नांदेड येथील काँग्रेस प्रदेश सचिव तथा भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांचा समावेश होता. या बैठकीत प्रत्येक जिल्हा निहाय व काही प्रमुख मतदारसंघ निहाय पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. यात मतदान यंत्रे हे एक कारण असून त्याशिवाय,लाडकी बहीण,मराठा आरक्षण, संघटन बांधणी आणि उमेदवारी वाटप या विषयावर सखोल चर्चा झाली.

संघटन बांधणीतील त्रुटी आणि निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन यात सुद्धा पक्षाची कमतरता शोधण्यात आली. काही ठिकाणी उमेदवार निवडीत चुका झाल्याचेही पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आणून देण्यात आल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रातील पक्षाच्या पीछेहाटीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. बैठकीतील आढावा आणि चर्चा जशीच्या तशी खा.राहुलजी गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्यासमोर मांडण्याचा अशोक गहलोत यांनी सांगितले. काँग्रेसच्या अशा कठीण काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे जपण्यात येईल असा शब्द खा.राहुलजी गांधी यांच्याकडून देण्यात आला. राज्यातून आलेल्या प्रतिनिधीमध्ये प्रा. भानुदास माळी, डॉ.श्रावण रॅपनवाड नांदेड आणि राजेंद्र परसावत मुंबई यांच्यासह अनेकांचा समावेश होता.