दि.२२(पीसीबी)-नाशिकमधील कथित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. “खरातला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याला त्याच्या कृत्यांची शिक्षा भोगावीच लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे हा अत्यंत गंभीर आणि निंदनीय गुन्हा आहे. या प्रकरणाचा भांडाफोड गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आला असून, तपास उच्चस्तरावर सुरू आहे.
या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, नाशिक पोलीस आयुक्त आणि SIT संयुक्तपणे तपास करत आहेत. “मी स्वतः राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
पीडित महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सामाजिक दबावामुळे अनेक महिला सुरुवातीला समोर येत नाहीत. त्यामुळे त्यांना धीर देऊन न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले. काही महिलांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी टीका केली. “कोणाजवळ ठोस पुरावे असतील तर ते द्यावेत, सरकार कारवाई करेल. मात्र विनाकारण आरोप करून वातावरण दूषित करू नये,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
खरातकडे विविध स्तरांतील लोक येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “फक्त कोणीतरी भेटले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. मात्र, या प्रकरणात ज्यांचा थेट सहभाग आढळेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, खरातला नियमबाह्य सवलती कशा मिळाल्या, याचाही तपास होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. विशेषतः ४० किलोमीटरच्या पाणी लाईनला मंजुरी देण्यात आली होती, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता या प्रकरणात आयकर विभाग, SIT आणि पोलीस यंत्रणा एकत्रितपणे तपास करत असून, आर्थिक व्यवहार, प्रभावशाली संबंध आणि संभाव्य मोठे रॅकेट यांचा शोध घेतला जात आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता, राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक दुव्यांपर्यंत पोहोचले असून, येत्या काळात आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









































