अशोक खरातच्या त्या वागण्यामुळे गावकऱ्यांमध्ये आजही भीतीचे वातावरण

0
2

दि.२२ (पीसीबी) – नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी शिवारात ‘भोंदू बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३० एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या जमिनीची बाजारभावानुसार किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व जागा कंपाऊंड करून बंदिस्त करण्यात आल्या असून, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, खरात हा केवळ अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच या जागेवर येत असे. त्या दिवशी तो आपल्या एजंट किंवा सहकाऱ्यांसह जमिनींची पाहणी करत असे. यावेळी दीपक लोंढे नावाचा एजंट त्याच्यासोबत असायचा, जो सिन्नर परिसरात जमीन व्यवहारात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. खरातच्या अनेक व्यवहारांत लोंढेचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. जमीन खरेदी-विक्रीदरम्यान पूर्ण पैसे न देणे, फसवणूक करणे आणि काही वेळा दमदाटी केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आजही खरातच्या नावाने गावात दहशत असल्याचे स्थानिक सांगतात.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पाथर्डी आणि गौळाणे शिवारात खरातच्या कुटुंबीयांच्यात्नी कल्पना, मुली तृप्तिबाला आणि सृष्टीनावावरही मोठ्या प्रमाणात जमीन आणि भूखंड नोंदवलेले आहेत. या मालमत्तेची किंमत ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर, विशेष तपास पथक (SIT) आणि आयकर विभागाने या सर्व मालमत्तेच्या स्रोतांची, खरेदीखतांची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. खरातच्या संपत्तीमागील आर्थिक जाळे आणि संभाव्य गैरव्यवहार उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रत्येक दुव्याची तपासणी करत आहेत.

एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता, कोट्यवधींच्या मालमत्ता, संशयास्पद व्यवहार आणि स्थानिक पातळीवरील दहशतीपर्यंत पोहोचले असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.