“अशोकजी सिंघल यांचे जीवन श्रीराममय होते!”

0
124

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) – “श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन श्रीराममय झाले होते!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी काढले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित, साप्ताहिक विवेक संपादित अशोकजी सिंघल यांच्या जीवनावर आधारित विशेषांकाच्या प्रकाशनात गोविंद शेंडे बोलत होते. विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष माधवी सौंशी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रा. संजय मुद्राळे, डॉ. प्रतिभा बोथारे आणि अनिल सांबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, “प्रत्येक भेटीत अशोकजी यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी वडिलांसारखी माया केली. पूजनीय गुरुजी यांच्यानंतर संघ परिवारात अशोकजी सिंघल यांनी संतांच्या प्रति आत्मीयता आणि समर्पित भाव प्रदर्शित केला. लहान असो की मोठा असो पण कोणत्याही संत व्यक्तिमत्त्वाला आदराने झुकून ते चरणस्पर्श करीत असत. अनेकांनी यांवर ‘अशोकजी, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात’ असे सांगितले होते. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात पूज्य देवराव बाबा यांचा आशीर्वाद घ्यायला ते गेले असता बाबा म्हणाले की, ‘तू फक्त रामनामाचा झंझावात सुरू कर म्हणजे यश मिळेल!’ आणि खरोखरच त्यांच्या आंदोलनाला सर्व दिशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ देशातच नव्हे तर विदेशात त्यांना अनुकूल प्रतिसाद लाभला. अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन संघशरण, संतशरण, संघटणशरण आणि श्रीराममय झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील विवादास्पद चबुतरा उखडून टाकण्यात आला आणि कालांतराने श्रीरामाचे भव्य मंदिर तिथे उभे राहिले. माननीय अशोकजी सिंघल यांना समजून घ्यायचे असेल तर ‘विवेक’चा हा अंक आवर्जून वाचा!” असे आवाहन त्यांनी केले. श्रीपाद रामदासी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.