नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिलीय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जशी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तशी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी, अशी मागणी दीपाली सय्यद यांनी केली. अशी मुलाखत घेतली तरच एकत्र येऊन यावर काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल, असंही सय्यद यांनी नमूद केलं. त्या मंगळवारी (२६ जुलै) दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “आजची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहिली. यानंतर मी संजय राऊत यांना एवढंच सांगेल की त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या, तशीच मुलाखत एकनाथ शिंदेंची घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल.”
“मी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार”
“महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच स्तरावर गेलंय हे सर्वांनाच माहिती आहे. मी शिवसेनेची कार्यकर्ता, नेता आहे. त्यामुळे यात मध्यस्थी होऊन पुन्हा आमचं घर एकत्र उभं राहावं. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आजही मी दिल्लीत आहे आणि अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. यात काही शिवसेनेचे नेते आहेत, तर काही भाजपाचे नेते आहेत. सगळ्यांना भेटत आहे, लवकरच काहीना काही निर्णय होईल,” अशी आशाही दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली.