… अशा नेत्यांनाच पक्षात प्रवेश देणार – शरद पवार

0
87

पिंपरी, दि.४ (पीसीबी) कोल्हापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अनेक नेते पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे येत आहेत. कागलचे भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलत असताना शरद पवारांनी सूचक विधान केले आहे. अनेक नेते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेत आहोत. पक्षात येणाऱ्यांची उपयुक्तता, त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम, स्वच्छ कारभार पाहून नेत्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे असे जे नेते पक्षात येण्यास इच्छुक आहेत, त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत, असे शरद पवार कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

फडणवीसांनी इतिहासाची चुकीची मांडणी केली
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वेगळे विधान केले. त्यातून ते असे ध्वनित करतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती आणि आम्हाला चुकीचा इतिहास शिकविला गेला. ज्यांचे आयुष्य इतिहासाचे संशोधन आणि अभ्यास करण्यात गेले त्यांना याबद्दल वास्तव मांडण्याचा अधिकार आहे. जयसिंगराव पवार यांनी काल आपले मत मांडले. ते म्हणाले, एकदा नाहीतर दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतवर स्वारी केली होती. त्यामागे त्यांचा काय उद्देश होता, हेदेखील त्यांनी सांगितले. दुसरे असे की, इंद्रजीत सावंत या दुसऱ्या इतिहास अभ्यासकांनी या मताला दुजोरा दिला. त्यामुळे नवीन पिढीसमोर खोटा इतिहास कुणी मांडू नये. चुकीचा इतिहास मांडल्यानंतर समाजात गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे इतिहासकारांनी जे मत मांडले, त्याचा आदर करणे गरजेचे आहे.

“महाराष्ट्रात रोज कुठेतरी महिलांवर अत्याचार झाल्याची बातमी कानावर येते. राज्य शासन विशेषतः गृहखातं यावर सक्तीची आणि कठोर कारवाई करून एकप्रकारचा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण करायला हवा. पण हे गृहखात्याकडून केले जात नाही”, अशी टीका शरद पवार यांनी केली. बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाला, ही संतापजनक घटना होती. याची प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये उठणे स्वाभाविक होते. पण सरकारने सांगितले की, ही बाहेरून आलेली लोक होते. बाहेरून कशाला कोण लोक आणेल? ज्या लोकांनी आंदोलन केले, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. लोकशाहीच्या चौकटीत बसून कुणी आंदोलन करत असेल तर ही चुकीची बाब नाही. पण त्यासाठी अस्वस्थ असलेल्या लोकांवर खटले दाखल करता, ही बाब निंदनीय असल्याचे शरद पवार म्हणाले.