अवैध माथाडी कामगारांवर कारवाई करणार

0
184

पुणे, दि.२५ (पीसीबी)- पुण्यातील आंदोलनादरम्यान पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सदस्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. येत्या काही दिवसांत अवैध माथाडी कामगारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (एमसीसीआयए) वार्षिक समारंभात फडणवीस बोलत होते.एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी आपल्या भाषणात पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला बाधा आणणाऱ्या माथाडी संकटाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी येत्या काही दिवसांत माथाडी कामगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

“मला माहीत आहे की अनेक राजकीय लोक अवैध माथाडी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. मात्र, कोणालाही सोडले जाणार नाही. यावर मी फार काही बोलणार नाही, पण तुम्हाला लवकरच कारवाई दिसेल”, असेही फडणवीस म्हणाले.

पीएफआयने शुक्रवारी पुकारलेल्या निदर्शनांदरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सखोल चौकशी सुरू आहे आणि निष्कर्षांच्या आधारे कारवाई केली जाईल. त्याचवेळी त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.