पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत. ब प्रभागातून सर्वाधिक 260 तर सर्वात कमी इ प्रभागात 56 अर्ज आले आहेत.
शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोद आहे. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड धारकांची संख्या कमी आहे. शहरात अवैद्य नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळती होते. तसेच, दूषित पाणीपुरवठाही होतो. याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमितीकरणासाठी सवलती जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्नही अतिशय कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येणार होते. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. ग्राहकांना 30 जूनपर्यंत या सवलत योजनेचा लाभ घेण्याची मुदत होती. या योजनेची आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, 1 हजार 19 नागरिकांनी अवैद्य नळजोड अधिकृत करण्यासाठी अर्ज केले आहेत. अवैध नळजोड अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करण्यासाठी नागरिकांना एक महिन्याचा कालावधी मिळाला आहे.