अवैध गॅस चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
174

सांगवी, दि. ३० (पीसीबी) – अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी सांगवी मध्ये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन तरुणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) दुपारी अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

विकासकुमार शंकरलाल (वय 23), पवनकुमार लाडूराम (वय 20, दोघे रा. पिंपळे गुरव. मूळ रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक गारगोटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून अवैधरीत्या तसेच कोणतीही खबरदारी न घेता रिफिलिंगच्या सहाय्याने चोरून गॅस लहान सिलेंडर मध्ये भरला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत नऊ घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, गॅस रिफील करण्याचे साहित्य, डिजिटल वजन काटा, दोन मोबाईल आणि एक टेम्पो असा एकूण दोन लाख नऊ हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.