अवैधनळजोड आता ३१ डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार

0
195

पिंपरी,दि.३१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 15 मिमी व्यासाचे घरगुती अनधिकृत नळजोड 31 डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार आहेत. अवैधनळजोड नियमित करण्यासाठी महापालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यात येत आहेत. त्याची मुदत पाणी पुरवठा विभागाकडून 30 जूनवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. यामध्ये नागरिकांना 15 मिमी व्यासाची घरगुती अनधिकृत जळजोड अधिकृत करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, नागरिकांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या मोहिमेला पाणी पुरवठा विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.

अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेकडून नळजोडांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी विहित अर्जासोबत आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड, मनपाचे मिळकतकर आकारणी बिल आणि लाइट बिलाच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जमा करावेत, किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.