पुणे, दि. २ (पीसीबी) – अविनाश भोसले. पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती. सध्या हे नाव बरेच चर्चेत आहे. २६ मे रोजी अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली होती. डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता त्यांचे व्हाईट हाऊस नावाचे अलिशान घर खाली करण्याचे आदेश सक्तवसुली संचलनालयाने दिले आहेत. सीबीआयसोबत ईडीने त्यांच्यावर कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. पण त्यांच्या व्हाईट हाऊस नाव असणाऱ्या अलिशान बंगल्याविषयी आपल्याला माहितीये का?
व्हाईट हाऊस. हे नाव वाचलं की आपल्याला अमेरिकेचं व्हाईट हाऊस आठवलं असेल. पण नाही. आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातील बाणेर भागात एक व्हाईट हाऊस आहे. अविनाश भोसले यांचं. हे अलिशान घर तब्बल 12 एकरात पसरलं आहे. व्हाईट हाऊस सारख्या दिसणाऱ्या याही अलिशान घराच नाव व्हाईट हाऊस असंच आहे. बाणेर भागात असलेल्या या घरावर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड आहेत. तब्बल १२ एकरात पसरलेल्या या घराचा पांढराशुभ्र रंग आपल्याला आकर्षित करून घेतो. प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हीच्या A Mighty Heart या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंगसुद्धा या बंगल्यात झालं होतं. त्यामुळे हा बंगला कायम चर्चेचा विषय ठरला आहे. अविनाश भोसले हे या सगळ्या संपत्तीचे मालक आहेत. पण ते आता सीबीआयने केलेल्या कारवाईत कोठडीत आहेत.
अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम कंपनी ABIL ग्रुपचे मालक आहेत. त्यांचे पुण्यातील महत्त्वाच्या भागात कार्यालये आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून अविनाश भोसले यांच्याकडे बघितलं जातं. पण ते सध्या ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. राज्यातील सर्वच राजकारणी व्यक्तींशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात भर पडली असे जाणकार सांगतात. त्यांनी 1979 मध्ये ABIL ग्रुपची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांच्या या बांधकाम व्यवसायाने झेप घेत उद्योगक्षेत्रात आपलं वलय निर्माण केलं.
त्यांचा प्रवास बघितला तर अविनाश भोसले हे आधी रिक्षाचालक होते. नोकरीधंद्याच्या निमित्ताने ते संगमनेरहून पुण्यात आले होते. सुरूवातीला त्यांनी रिक्षा चालवायला सुरूवात केली. पुढे त्यांनी बांधकामाचे कंत्राट घ्यायला सुरूवात केली आणि त्यांनी बांधकाम क्षेत्रात पूर्णवेळ काम करायला सुरूवात केली. पुढे त्यांनी सरकारी बांधकाम कंत्राट घ्यायला सुरूवात केली. पुढे 1995 मध्ये त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचं काम मिळालं आणि त्यांच्या धंद्याला खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरूवात झाली. राजकारण्यांशी जवळच्या संबंधामुळे त्यांना सरकारी काम मिळत गेले. आणि ABILने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
अविनाश भोसले हे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. पुण्यातील बाणेर भागात असलेल्या त्यांच्या अलिशान बंगल्याचं नावही व्हाईट हाऊस. त्यामुळे ते बऱ्याच वेळा चर्चेत आले. कोरेगाव पार्क परिसरत त्यांचे मोठे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी बड्या राजकारणी नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत. राजकारण्यांना वापरण्यासाठी जे हेलिकॉप्टर्स असतात ते हेलिकॉप्टर्स सहसा अविनाश भोसले यांचे असतात. त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड असल्यामुळे त्यांच्या घराची शान वाढली आहे पण १२ एकर मध्ये पसरलेल्या या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. अविनाश भोसले यांचे राहते घर असलेले व्हाईट हाऊस आता ईडीने खाली करण्याचे आदेश दिले आहेत.