नागपूर दि . ४ ( पीसीबी ) : राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीच्या घटनांवर पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, नागपूरमध्ये आणखी एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मयुरी ठाकरे डाहुले हिने लग्नानंतर अवघ्या ३५ दिवसांत आत्महत्या केली आहे.
२५ एप्रिल २०२५ रोजी मयुरीचा विवाह अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या आनंदाने पार पडला. पण लग्नाच्या काहीच दिवसांत तिचे आयुष्य दुःखाच्या आणि अत्याचाराच्या चक्रव्यूहात अडकले. सासरच्यांनी लग्नात अपेक्षित खर्च न केल्याचा राग मनात धरून मयुरीकडे सतत पैशांची मागणी सुरू केली. नवविवाहित असतानाही, अभिषेकचे वडील दीपक डाहुले, आई कुसुम डाहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांच्याकडून मयुरीला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.
मयुरीने आधी आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली नव्हती. तिने वाट पाहिली की कदाचित नव्याने सुरु झालेलं हे नातं काही काळानंतर सुरळीत होईल. मात्र माहेरी आल्यावर तिने वडिलांना सत्य सांगितले. वडिलांनी गटाच्या भीशीमधून २० हजार रुपये सासरकडच्यांना दिले. पण जाच काही थांबला नाही. अखेर ३० मे रोजी मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले व दीर आदित्य डाहुले यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकाराच्या घटना महाराष्ट्रात चिंताजनक वेगाने वाढत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, निषेध मोर्चे निघाले. मात्र प्रशासन आणि समाज यांच्याकडून या विषयाकडे पुरेसं गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.हुंडा प्रथा ही कायद्यानं गुन्हा असूनही, अनेक ठिकाणी ती अजूनही पिढ्यानपिढ्या चालू आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नवविवाहित महिलांवर होणारा मानसिक व शारीरिक छळ, कधी थेट हत्येच्या स्वरूपात, तर कधी आत्महत्येच्या प्रकरणांमधून समोर येतो. महिलांवर होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी केवळ कायदे नव्हे, तर समाजातही जागरूकतेचा मोठा उठाव होण्याची गरज आहे










































