अवघ्या एक हजारात अयोध्या दर्शन, भाजपची मोहिम

0
139

अयोध्या, दि. २४ (पीसीबी) : अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आपले आराध्य प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी राम भक्त अधीर होत आहेत. अयोध्येत लाखो राम भक्त उपस्थित आहेत. त्याचवेळी भाजपच्या ‘श्री रामजन्मभूमी दर्शन’ अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज याची सुरुवात केली आहे. याअंतर्गत प्रत्येक लोकसभेतून 6 हजार भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे. ही मोहीम २५ मार्चपर्यंत चालणार आहे.

भाजपकडून 25 हजार भाविकांची राहण्याची व्यवस्था
भाविकांना केवळ एक हजार रुपयांत अयोध्येपर्यंत प्रवास, निवास आणि दर्शनाची सुविधा दिली जात आहे. तुम्हालाही रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर केवळ एक हजार रुपये खर्चून ही सुविधा मिळू शकते. भाजपने आपल्या सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघातील ज्या लोकांना रामाचे दर्शन घ्यायचे आहे, अशा सर्वांना अयोध्येला नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर भाजपने अयोध्येत 25 हजार भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी राम भजन, कीर्तन, रामलीला असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचीही तयारी सुरू आहे.

1000 रुपये केवळ भगवान रामाच्या दर्शनासाठी गंभीर अससेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठेवण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांतील रामभक्तांना अयोध्येत नेऊन दर्शन देण्याची तयारी सुरू आहे. विश्व हिंदू परिषद आपल्या स्तरावर सुमारे 5000 कार्यकर्त्यांना रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला घेऊन जाण्याचा विचार करत आहे.