अल्पसंख्याक समाजाचा अजितदादाच्या राष्ट्रवादीवर विश्वास – बैठकीत जोरदार प्रवेश, बदलाचा निर्धार

0
17

आज अल्पसंख्याक समाजातील बांधवांसोबत बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचं पक्षात स्वागत केलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज सर्वत्र महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनंच पुढे चाललो आहोत. पिंपरी-चिंचवड आणि माझं नातं १९९१ सालापासूनचं आहे. या शहरासाठी काय केलं आणि काय राहिलं, हे नागरिकांना चांगलं माहीत आहे, असं बैठकीत स्पष्ट केलं.

मी कधीही जात, पात, नाती, गोती पाहून राजकारण केलं नाही. सेक्युलर विचार घेऊनच कामं केली. या शहरात सर्व समाजांना सोबत घेऊन पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते अशा अनेक सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळावं, त्यांच्या प्रश्नांना वाचा मिळावी यासाठीही कायम प्रयत्नशील राहिलो.

दुर्दैवानं ज्यांच्या हातात नंतर कारभार गेला, त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आमच्या काळात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही, मोठ्या प्रमाणात विकासकामं केली. आज कर्जरोख्यांची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात शहरावर कर्जाचा बोजा वाढवण्याचं काम केलं गेलं.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक महापुरुषांची नावं आम्ही विकासकामांना दिली. आता काळ बदलतोय, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा करता येईल, यावरही आम्ही भर देत आहोत. पण सध्या जनतेची भ्रमनिराशा केली जात आहे, राजकीय पोळी भाजण्याचं प्रयत्न सुरू आहेत, असं सूचित केलं.

दरम्यान समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास, हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचं बैठकीत स्पष्ट केलं. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत कामं करतो, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आज वेगवेगळ्या संघटनांनी दिलेला पाठिंबा हीच माझ्या कामाची पावती आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वांनी साथ दिली, तर बदल नक्की घडेल. जे काही करावं लागेल, ते करण्याची ताकद आणि तयारी आमच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी कायम उभा राहील, असा विश्वास अल्पसंख्याक समाजातील बांधवांना दिला.