पिंपरी दि. १९ (पीसीबी) – सार्वजनिक शौचालयात निघालेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून तसेच १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून दोघींचा विनयभंग केला. ही घटना १२ ते १७ जून या कालावधीत साई चौक, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
दादासाहेब बापूराव कोल्हे (वय ३७, रा. नाणेकरचाळ, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. १८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मैत्रीण सार्वजनिक शौचालयात जात असताना आरोपीने पाठीमागून येऊन त्यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांची १० वर्षीय मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्याशी देखील अश्लील चाळे करून तिचाही विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.













































