चाकण, दि. १९ (पीसीबी) – आईच्या मित्राने आईसमोर तिच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले. हा प्रकार कोणास सांगितला तर फाशी घेईन अशी आईने मुलीला धमकी दिली. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून आईसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत चक्रेश्वर रोड, चाकण येथे घडला.
याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने १७ जानेवारी २०२३ रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची पत्नी आणि तिचा मित्र सुरज अजगर चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि पत्नी या दोघी पत्नीच्या मित्राच्या घरी राहत होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले. तिचे अश्लील फोटो काढून तिचा विनयभंग केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर मी फाशी घेईन अशी फिर्यादी यांच्या पत्नीने मुलीला धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.












































