अर्बन स्ट्रीट डिझाईननुसारचे पदपथ नागरिकांच्या सोयिचे – आयुक्त शेखर सिंह

0
280
  • बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या एमडीआर – ३१ रस्त्याचे फूटपाथ अर्बन स्ट्रीटचे काम सुरू

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांचा विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना तसेच वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून वर्दळ कमी होण्यासही मदत होत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन काम करत असते त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पदपथांवर किंवा रस्त्यावर वर्दळ होईल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये. तसेच एक सुजाण नागरिक म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे तसेच शहराच्या विकासात हातभार लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या एमडीआर – ३१ रस्त्याचे फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपुजन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या एमडीआर – ३१ रस्त्यावर पदमजी पेपरमील, बिर्ला हॉस्पिटल, महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन खात्याचे डेअरी फार्म, शाळा, कॉलेज तसेच व्यावसायिक आणि रहिवासी इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथे वाहनांची तसेच पादचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या वर्दळीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी हा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपनुसार विकसित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. हा प्रकल्प केवळ सुशोभिकरणासाठी नसून यामुळे वाहतुक सुरळीत होऊन पादचाऱ्यांना, सायकलस्वारांना आणि वाहनचालकांना सुलभतेने आणि सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार पदपथ विकसित केल्याने सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि वाहनतळ या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

प्रकल्पाबाबत माहिती देताना सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा रस्ता हिंजवडी आय.टी. पार्क कडून डांगे चौक मार्गे चिंचवड एमआयडीसी, भोसरी, चिखलीकडे जाणाऱ्या विकास आराखड्यातील ३४.५ मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आहे. तसेच हा रस्ता औंध-रावेत या ४५ मीटर रुंदीच्या बीआरटीएस रस्त्याला जोडणारा फिडर रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि या रस्त्याचा अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकास करणे गरजेचे आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार असून रस्त्यावर बसण्यासाठी दगडी आसने, जिम साहित्य तसेच म्युरल, पॅराबोला इ. सुविधा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच रात्री पादचारी मार्गावरील चांगल्या दृश्यमानतेसाठी अत्याधुनिक पथदिवेही बसविण्यात येणार आहेत.

भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद ओंभासे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.