अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते, फूटपाथ डिझाइन करण्यावर पालिकेचा भर

0
418

पिंपरी, दि.१० (पीसीबी)- भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली 2019 पासून अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असून यासाठी सुमारे 34 कोटी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झाले नसतानाच आता आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव हा रस्ता आणि फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते, फूटपाथ डिझाइन करून त्यावर कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करण्याचा पालिकेचा सपाटा सुरू आहे.

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत आहे. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली 2019 पासून अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असून यासाठी सुमारे 34 कोटी पेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. हा अर्बन स्ट्रीट प्रकल्प फसला असताना प्रशासनाची अशा प्रकल्पांवर उधळपट्टी सुरूच आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव या रस्त्यावर अर्बन स्ट्रीटनुसार रस्ता व पदपथ विकसित करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या रस्त्यावर पदमजी पेपर मिलसारखा औद्योगिक प्रकल्प, बिर्ला हॉस्पिटल, पशू संवर्धन खात्याचे डेअरी फार्म, शाळा, कॉलेज, व्यावसायिक व रहिवासी भाग आहे. वाहनांसोबतच पादचाऱ्यांचीही दाट वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतो. पदपथावर पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे इथे गैरकृत्ये घडतात. तसेच, वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्याची नागरिकांची व व्यावसायिकांची मागणी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. ऍश्‍युअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी विस्तृत सर्व्हेक्षण करून स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जल:निस्सारणविषयक कामाचे अंदाजपत्रक सन 2022-2023 च्या दरसूचीनुसार तयार केले आहे. त्यानुसार या रस्त्यांच्या कामासाठी 24 कोटी 97 लाख रुपये खर्च येणार असून या खर्चाला आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.