अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट – अजित गव्हाणे

0
320

– चार वर्षात ठोस काम नसताना ३४ कोटींचा खर्च

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – वाहतूक कोंडी दूर करणे, सुशोभीकरण या नावाखाली भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूला खाली 2019 सालापासून अर्बन स्ट्रीटचे काम हाती घेण्यात आले.सुमारे 34 कोटी रुपयाहून अधिक खर्च या कामासाठी करण्यात आला आहे. मात्र अद्यापही ठोस असे कोणतेही काम दिसत नाही. उलटपक्षी केलेले काम उखडून पुन्हा नव्याने कामे केली जात आहे. ही निव्वळ जनतेच्या पैशाची लूट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी केला.

भोसरी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला धावडेवस्ती, अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत आणि स्मशान भूमीच्या रस्त्यावर अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. मंगळवारी ( दि. 6) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपच्या सत्ता काळात अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार फूटपाथ ही संकल्पना अगदी जोमात सुरू झाली. 2019 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम भोसरीमध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली फुटपाथ मोठे केले. राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली धावडे वस्ती ते अंकुशराव लांडगे सभागृह स्मशानभूमी रस्ता तसेच मंकीकर हॉस्पिटलपर्यंत अर्बन स्ट्रीटचे काम हाती घेण्यात आले. गेल्या चार वर्षात पालिकेने तब्बल 34 कोटी या कामावर खर्च केला. मात्र ठोस असे काहीच अद्यापही दिसत नाही. उड्डाणपूलाखाली चांदणी चौकामध्ये गार्डन आणि लँडस्केपिंग करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली. ब्लॉक बसवण्यात आले. मात्र आता हे सर्वच उघडून टाकण्यात आले आहे. काम सुरू करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने या कामाला प्रचंड विरोध केला होता. मात्र नगरसेवकांचे म्हणणे ऐकून न घेता हे काम रेटून देण्यात आले. त्याचेच परिणाम आता दिसत आहे. या कामावर झालेला खर्च म्हणजे निव्वळ जनतेच्या पैशाची लूट करण्यात आली आहे.

टक्केवारीसाठी रस्त्यांचा गळा घोटण्याचे काम –
अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली भाजपच्या काही लोकांनी जनतेच्या पैशाची लूट केली. या कामांतर्गत फुटपाथ मोठे करण्यात आले. रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणून ही कामे सुरू झाली. ४५-६० फूट रस्त्यावर दोन्ही बाजुला दहा ते पंधरा फूट रुंदिचे फूटपाथ बांधले आहेत. त्याची खरोखर गरज आहे का ते पाहिले जात नाही. त्यातून रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. प्रशस्त रस्त्यांचे बोळकांड झाल्याचे अनेक दाखले आहेत. अर्बन स्ट्रीट योजनेतील या फूटपाथमुळे भोसरीतील उड्डाणपुलाखालील रस्ता अगदी चिंचोळा झाला आहे . काही लोकांच्या टक्केवारीसाठी या रस्त्यांचा अक्षरशः गळा घोटण्याचे काम आजही वेगात सुरू आहे. ही लोकांची गरज नाही, तर गैरसोय आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली ही कामे रेटून नेली जात आहेत. या कामांमुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी दिसून येत आहे

भोसरी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजुला धावडे वस्ती अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत आणि स्मशानाच्या रस्त्यावर फूटपाथ बांधल्याने भोसरीकर जाम वैतागलेत.रोज अक्षरशः वाहतुकीचा बट्ट्याबोळ होतो.सायंकाळी लोक खरेदीसाठी बाहेर पडतात, त्यावेळी भाजीमंडई, मासे विक्रेते, वडापावच्या हातगाड्यांनी फूटपाथ गजबजून जातो. महापालिकेचे अतिक्रमण पथक आले की किरकोळ कारवाई करते आणि तासाभरात परिस्थिती जैसे थे होते.

भोसरीमध्ये संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झालेला आहे . रोजच्या किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक, वाहनचालक, वाहतूक पोलिस सगळेच या फूटपाथमुळे त्रासलेले असताना काही लोकांच्या हट्टापायी ही कामे सुरू आहेत. मात्र ही केवळ करदात्यांच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी आहे. ३४ कोटींचा खर्च नक्की कुठे मुरला याबाबत चौकशी झाली पाहिजे. महापालिका आयुक्तांनी याबाबत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.