अर्धवट माहिती असलेले प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळले

0
340

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे स्थायी समिती, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी विभागप्रमुखांनी पाठविलेले प्रस्ताव अर्धवट माहितीचे असल्याने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फेटाळले आहेत. सविस्तर माहितीसह फेर सादर करण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिले. तर, गोलगोल माहिती देणाऱ्या सह शहर अभियंत्याला खडेबोल सुनावले.

प्रशासक  शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) स्थायी समिती, सर्वसाधारण सभा झाली. मान्यतेसाठी 21 प्रस्ताव ठेवले होते. त्यातील 13 मंजूर केले. तर, सविस्तर माहिती नसलेले 8 प्रस्ताव बाजूला ठेवले आणि फेरसादर करण्याचे आदेश दिले. शहरातील विविध विकास कामांच्या खर्चाचे विषय, धोरणात्मक विषयाला स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक असते. प्रशासकीय राजवट असल्याने स्थायी, सर्वसाधारण सभेचे अधिकार प्रशासकाला दिले आहेत. विभागप्रमुखांकडून प्रस्ताव थोडक्या माहितीत मंजुरीसाठी पाठविले जातात. त्या विषयाच्या निविदेची सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे सविस्तर माहितीसह विषय सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

निविदा कधी प्रसिद्ध केली? निविदा कालावधी किती होता? कमी निविदा आल्यास निविदेला मुदतवाढ दिली का? कितीवेळा मुदतवाढ दिली? निविदा रक्कम किती आहे? किती निविदाधारक आले होते?कितीने बिलो होती?कोणाचा दर स्वीकारला? कधी स्वीकारला?

अशी सविस्तर माहिती विषयपत्रावर असली पाहिजे, अशा सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रेनेज लाईनला जोडले नाहीत, असे किती स्वच्छतागृह आहेत. त्याचे पाणी थेट नदीत सोडले जात आहे? याची संख्या आयुक्त सिंह यांनी ड्रेनेज विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना विचारली. तांबे हे संख्या सांगण्याऐवजी गोलगोल उत्तरे देवू लागले. त्यामुळे आयुक्त चिडले. तुम्ही गोलगोल उत्तरे देऊ नका, असे खडेबोल सुनावत योग्य ती माहिती द्यावी. किती ठिकाणी स्वच्छतागृह ड्रेनेजलाईनला जोडू शकतो? किती ठिकाणी जोडू शकत नाही? याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश आयुक्तांनी त्यांना दिले.