अर्थसंकल्प म्हणजे ‘घालीन लोटांगण वंदीन बिहार – खासदार डॉ.अमोल कोल्हे

0
147

केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!’ असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याच बरोबर एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एनडीए सरकारच्या आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी केवळ सरकार वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड असून ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर सरकार उभं आहे, त्या जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करून बिहार आणि आंध्रप्रदेशला खैरात देण्याचा एनडीए सरकारचा प्रयत्न असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

बिहार व आंध्रप्रदेशला निधी मिळतो या विषयी कुणालाही दु:ख वाटण्याचं कारण नाही, परंतु जो महाराष्ट्र देशाला सर्वाधिक महसूल देणारं राज्य आहे, त्या महाराष्ट्राच्या तोंडाला एनडीए सरकारने अक्षरशः पाने पुसल्याची टीका करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, मग प्रश्न निर्माण होतो की, जे ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे, ते वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिल्लीच्या वाऱ्या करीत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार काय करतंय? ट्रिपल इंजिन सरकारची केंद्र सरकारमध्ये काही भूमिका आहे असे आताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का? जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस व घसघशीत दान का पडलं नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. खरं तरं महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (23 जुलै) सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री सीतारामण यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला.