अरेरे…, निलमताई तुम्हीसुध्दा

0
412

मुंबई, दि. ७ जुलै (पीसीबी) – शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित आहेत. यामुळे ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला असल्याचे बोलले जात आहे. गेली तीन टर्म विधानसपरिषदेत शिवसेनेची बाजू अत्यंत समर्थपणे मांडणाऱ्या गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश हा खूप मोठा झटका आहे. शिवसेनेतील एकमेव महिला अभ्यासू वक्त्या म्हणून त्यांचा मोठा परिचय होता, पण ती जागा सुषमा अंधारे यांनी कव्हर केल्याने निलमताईची नाराजी वाढली होती.

नुकतंच ठाकरे गटाच्या विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची साथ सोडली होती. आज नीलम गोऱ्हे यांचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे, हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का आहे.
नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही, त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली. मूळच्या महिला चळवळीतील समाजवादी कार्यकर्त्या असलेल्या निलमताई शिवसेनेची ओळख बनल्या होत्या.