दि . १४ ( पीसीबी ) – स्मार्टफोन आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनच्या मदतीने केवळ चॅटींग आणि कॉलिंगच करता येत नाही तर आपण ऑनलाईन पेमेंट देखील करू शकतो.
स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तिला पैसे पाठवू शकतो. यासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ लागतो. स्मार्टफोनद्वारे कोणालाही क्षणार्धात पेमेंट करता येते. नेट बँकिंगमुळे लोकांना बँकांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज देखील भासत नाही. क्षणार्धात कोणाच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात.
आपण एखाद्या दुकानदाराच्या किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये देखील पैसे ट्रांसफर करू शकतो. अनेकदा ऑनलाईन पेमेंट करताना आपण खूप घाईत असतो. अशावेळी आपल्याला कोणा एकाच्या अकाऊंटवर पैसे ट्रांसफर करायचे असतात, पण हे पैसे भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर होतात आणि अशावेळी प्रचंड गोंधळ निर्माण होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घाबरतात आणि आपले पैसे परत कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू लागतात.
अशा घटना अनेकदा नंबरवरून पैसे ट्रांसफर करताना घडतात. कारण एखादा नंबर चुकला तर भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर होतात. पण अशा परिस्थितीत आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही चुकून चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर घाबरू नका. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.
ज्या बँकेतून पैसे ट्रांसफर केले आहेत त्या बँकेच्या शाखेशी किंवा ग्राहक सेवेशी त्वरित संपर्क साधा. यानंतर, पेमेंट तपशील (व्यवहार आयडी, तारीख आणि वेळ, पाठवलेली रक्कम आणि चुकून प्रविष्ट केलेला खाते क्रमांक) तुमच्या बँकेसोबत शेअर करा. यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक किंवा विनंती क्रमांक मिळेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँकेला ई-मेलद्वारे देखील याबद्दल कळवू शकता. तुमच्या माहितीच्या आधारे, बँक ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याच्याशी बोलेल. चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत पाठवण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल. अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही चुकून ट्रांसफर केलेले पैसे परत मिळणार आहेत. पण ही तक्रार तुम्हाला तात्काळ करावी लागणार आहे.
जर त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्याविरुद्ध खटला देखील दाखल करू शकता. चुकून तुमच्या खात्यात पैसे येणे म्हणजे पडलेले पैसे शोधण्यासारखे आहे. ते पैसे ज्याच्या मालकीचे असतील त्यांना परत करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. पैसे परत न करणे हे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे, ज्यासाठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये चुकून पैसे ट्रांसफर झाले आणि त्याने ते पैसे परत करण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.