अरुण गराडे साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित

0
76

पिंपरी , दि. 15 (पीसीबी) : “समाजातील सर्व क्षेत्रात सलोख्याची गरज असून सुसंवादानेच तो प्रस्थापित होईल. अर्थातच कामगार क्षेत्रही त्याला अपवाद नाही!” असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अभिनीहार बुद्ध विहार, सांगली येथे रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते आणि साहित्यिक अरुण गराडे यांना साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. माजी राज्यमंत्री अण्णा डांगे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेल्या अरुण गराडे यांना सन्मानित करताना
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवड येथील औद्योगिक परिसरात कॉम्रेड दादा रूपमय चॅटर्जी यांनी कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सुसंवादाचा सेतू उभारला होता. त्यांच्या योगदानाचा हृद्य आलेख अरुण गराडे यांनी आपल्या पुस्तकातून घेतला आहे. गराडे यांचे लेखन म्हणजे जणू एका गुरूला त्याच्या सत्शिष्याने अर्पण केलेली ही आदरांजलीच आहे!”

महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुण गराडे यांनी आपल्या मनोगतातून, “कॉम्रेड दादा रूपमप चॅटर्जी यांच्या सान्निध्यात सुमारे तेरा वर्षे कामगार क्षेत्रात काम
करण्याची संधी मला मिळाली; परंतु त्यांच्या शिकवणीची शिदोरी आजतागायत माझ्यासोबत आहे!” अशी भावना व्यक्त केली. सचिन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. कांबळे यांनी आभार मानले.