अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मोठं षडयंत्र

0
210

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणावरून राज्यात लोकसभा निवडणुकीचे रण चांगलेच तापलं आहे. भाजप आणि आप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतेच तिहार जेलमधून बाहेर आलेले आपचे खासदार संजय सिंह यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोठं षडयंत्र रचत त्यांना अडकवले असल्याचा दावा सिंह यांनी आज केला.

संजय सिंह हेही मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जेलमध्ये होते. त्यांना मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आले होते. नुकताच जामीन मंजूर झाल्याने ते जेलमधून बाहेर आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित भाष्य मीडियासमोर करू नये, अशी अटही त्यांच्यावर घालण्यात आली आहे. आज त्यांनी ईडीवर जोरदार हल्ला चढवला.

ईडीने षडयंत्र रचल्याचे सांगत सिंह म्हणाले, मगुंटा रेड्डी या व्यक्तीने तीन तर त्यांचा मुलगा राघव मगुंटाने सात जबाब दिले. पहिल्या जबाबात मगुंटा यांनी केजरीवालांना चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीबाबत भेटल्याचे त्यांनी ईडीला सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या मुलाला अटक झाली. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर वडिलांनी जबाब बदलला.

राघवचे सात जबाब 10 फेब्रुवारी ते 17 जुलै दरम्यान बाहेर आले. सहा जबाबात केजरीवालांचे नाव नाही. मात्र, सातव्या जबाबात ईडीच्या षडयंत्रात सहभागी होत केजरीवालांचे नाव घेतले. अनेक महिन्यांच्या त्रासानंतर त्यांनी जबाब बदलला, असा दावा सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, जेलमधून बाहेर आल्यानंतर सिंह म्हणाले होते की, केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन हेही लवकरच जेलमधून बाहेर येतील. सिंह यांना मागील वर्षी चार ऑक्टोबर रोजी अटक कऱण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने मंगळवारीच त्यांची जामिनावर सुटका केली आहे. याच प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदियाही जेलमध्ये आहेत.

मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीकडून कोर्टात केला जात आहे. केजरीवालांसह आप पक्षाने गोव्यातील निवडणुकीसाठी या प्रकरणात मिळालेल्या पैशांचा वापर केलाचा दावा ईडीने केला आहे. आपची काही मालमत्ता जप्त करायच्या असल्याचेही ईडीने कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.