अरब राष्ट्रांनी कान पिळल्यावर मोदी सरकारला जाग आली; मोदी हे भारतातील मुस्लिमांचे का ऐकत नाहीत, असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

0
275

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – भाजपच्या दिल्लीतील प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका डिबेटमध्ये बोलताना महंमद पैगंबरविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे देशातील मुस्लिम समाज प्रक्षुब्ध झाला आणि देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु पंतप्रधान मोदींनी व भाजपने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अरब राष्ट्रांनी (सौदी अरब, दुबई, कतार) भारतीय राजदूताला बोलावून याबाबत विचारणा करीत तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यानंतर मात्र केंद्र शासनाला जाग आली व त्यांनी नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करीत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. मोदी हे भारतातील मुस्लिमांचे का ऐकत नाही असा सवाल एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

ओवेसी पुढे म्हणाले की, मला हे समजत नाही,’हे कसले परराष्ट्र धोरण आहे.’ धर्मनिरपेक्ष देशही या मुद्द्यावर मौन बाळगून होते, मात्र काल संध्याकाळपासून अचानक सर्वजण सक्रिय झाले असून आता वक्तव्ये दिली जात आहेत. माझ्या सांगण्यावरून तुम्ही कोणतीही कारवाई का केली नाही? परक्या लोकांचा मुद्दा तुम्हाला कळतो आणि आमचे प्रश्न समजत नाहीत का?’

ते पुढे म्हणाले की, भाजपने आपल्या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यास विलंब केला. आम्ही यापूर्वीही सांगितले आहे, परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा प्रश्न अरब देशांमध्ये उपस्थित झाल्यावर कारवाई करण्यात आली. हा निर्णय 10 दिवसांपूर्वीच घ्यायला हवा होता. पैगंबरांवर वादग्रस्त विधाने केली जात आहेत. हरिद्वारमध्ये द्वेषपूर्ण भाषण झाले. नुपूर शर्माला तत्काळ अटक करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी केली.