‘अरंगेत्रम्’ : एक नृत्याविष्कार

0
205

सांगवी, दि. २० (पीसीबी) – भरत नाट्यम् या नृत्य शैलीतील ‘अरंगेत्रम्’ हा एक अवर्णनिय कार्यक्रम शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सादर करण्यात आला. वाकड येथील ब्लॉसम नृत्य अकादमीच्या संचालिका गुरु मौसम मेहता यांच्या शिष्या कुमारी चिन्मयी देशमुख, कुमारी शर्वरी मुळूक आणि कुमारी अवनी कुलकर्णी या बारा-तेरा वर्षांच्या कोवळ्या मुलींचे हे सादरिकरण अथक तीन तास चालू होते.

नृत्य प्रकारात ‘अरंगेत्रम्’ म्हणजे जवळपास आठ वर्षांच्या अथक मेहनती नंतर आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी समर्पित वृत्तीने रंग-मंचावर पहिले पाऊल टाकणे. या मुलींचे हे पहिले पाऊलच एवढे आत्मविश्वासपूर्वक होते की, ते पहिले आहे हे कोणास उमगू देखील आले नाही. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींचे हे सादरीकरण असे काही प्रत्ययकारी होते की, त्यांनी खचाखच भरलेल्या नाट्यगृहतील प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले.

‘पुष्पांजली’ या नृत्य प्रकारातून आद्य शंकराचार्य रचित शिव-वंदना व रंगमंचा वरील सर्व निष्णात वादकांना व माय-बाप प्रेक्षकाना भावपूर्ण वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही सुरुवातच अशी होती की, येथून पुढे डोळ्याचे पारणे फेडणारी कलाकृती आपणास पहावयास मिळणार याची खात्री सर्व रसिक प्रेक्षकांना झाली. मग मृदुंग, घटम्, व्हायोलिन, बासूरी, टाळ यांचा सुंदर मिलाफ आणि गुरु श्री शिव प्रसाद यांच्या रागदारी युक्त मंजुळ गायनाचा नेमका धागा पकडून या तीन देवींनी कार्यक्रमात अशी काही बहार आणली की, त्यांच्या कलाकृतीचा आलेख वरचेवर उत्तरेकडेच झेपावत राहिला. वादक आणि गायक यांच्या तालावर होणारा नेमका पदन्यास, भृकुटी विभ्रम, नयन विलोभन, हस्त व कराग्र लाघव, जोडीला प्रत्येक नृत्य प्रकारास शोभेल अशी भर्जरी वेशभूषा, सुंदर मेकअप आणि प्रभावी प्रकाश-ध्वनि योजना असे या कार्यक्रमाचे थोडक्यात वर्णन करता येईल. या तीनही कलाकारांनी परस्परातील समन्वय व सजगता यांचे ध्यान राखून असे काही प्रदर्शन केले की, त्या हौशी वा नवख्या आहेत असे कोणासही यत्किंचितही जाणवले नाही. त्यांनी सादर केलेल्या जाती स्वरम् (राग: कल्याणी, ताल : रुपक), शिव प्रार्थना (राग: रेवती, ताल: आदी), मुथु स्वामी दीक्षित रचित दशावतार (राग आणि ताल : रेवती) या कलाकृती खूपच प्रत्ययकारी होत्या. त्यांच्या नृत्याभिनयातून आपण श्रीकृष्ण लीला, संत नरसी मेहता व संत मीराबाई यांचे ठाईचे कारुण्य, राम-रावण युद्ध, शिव-तांडव, शेषशायी विष्णु शयन, असुर वध आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत याचा आभास क्षणोक्षणी निर्माण होत होता. प्रत्येक नृत्य कृतीतून त्या आपल्या सादरीकरणास उत्तरोत्तर उंचीवर नेऊन ठेवत होत्या. कोणत्याही व्यावसायिक कलाकारा पेक्षा त्या बारा-तेरा वर्षांच्या कळ्यांचे रङ्गमंचावर सहजतेने उमलून येणे रतिभर देखील कमी नव्हते. त्यांचे ते फुलणे सारे रसिक अनिमिश नेत्राने टिपत होते, प्रफुल्लित होत होते.

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून भारतातील कथ्थक नृत्य शैलीच्या प्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती शमा भाटे तर आशीर्वाद देण्यासाठी ‘मोक्ष नृत्य प्रशालेच्या’ कीर्तिमान प्रशिक्षिका सुश्री अंजली बागल या आवर्जून उपस्थित होत्या. अर्जुन अवॉर्ड विजेत्या नेमबाजपटू सुश्री अंजली भागवत, हिंजवडी येथील ब्लु रिज प्रशालेच्या प्राचार्या सुश्री सूरिंदर सायान, आणि नगरसेविका सुश्री आरती ताई चोंधे या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या.

आपल्या संबोधनात शमा ताईंनी या मुलींचे, त्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या गुरु मौसम मेहता यांचे खूप कौतुक केले. सुश्री अंजली बागल या तर मौसम मेहता यांच्या गुरु ! “मौसम यांच्या सारख्या मेहनती, कुशाग्र बुद्धी शिष्येने तिच्या सारखेच गुणी व सुबुद्ध कलाविशारद शिष्य निर्माण करावेत यांचा अभिमान वाटतो” असे कौतुकोत्द्गार त्यांनी काढले. सुश्री अंजली भागवत यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्व विषद करून कोणत्याही कला वा क्रीडा प्रकारात उत्तम गुरु होणे हे किती अवघड असते असे स्वानुभवा वरून व गुरु मौसम यांनी घडविलेल्या या शिष्यांच्या पदर्पणातील प्रदर्शनातून दिसून आले असे सांगितले. प्राचार्या सुश्री सायाल यांनी या मुलींचा अभिमान वाटतो असे सांगून त्यांच्या करियर साठी आशीर्वाद दिले. कार्यक्रम संपण्या आधीच्या प्रवेशात त्या तीनही कन्या आपल्या मनोगता ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या त्यातुन त्यांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव, गुरु विषयीचा आदर, कुटुंबा विषयीची बांधिलकी आणि सभा धीटपणा याचा प्रत्यय येत होता. गुरु मौसम यांना मराठी भाषा चांगलीशी बोलता येत नसताना सुद्धा शिष्यावरील प्रेमापोटी त्या सुंदर मराठीतून व्यक्त झाल्या. त्यातून या मुलीं विषयीचाचे प्रेम व विश्वास ओतप्रत भरून वाहत होता.

कलाकार कन्यकांच्या पालकांचे वतीने आभार प्रदर्शन करताना कु. चिन्मयीचे वडील वाकड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अनय देशमुख यांनी या सर्व यशाचे श्रेय कला गुरु सुश्री मौसम मेहता यांना असल्याचे सांगून आपल्या विद्यार्थिनींना अपत्या प्रमाणे वागवून त्यांच्या कडून नेमके व हवे ते करून घेतल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच प्रमाणे या कार्यक्रमास साथ देण्या साठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर हजारो नृत्य कार्यक्रमांना साथ देणारे ख्यातनाम गुरु शिव-प्रसाद आणि त्यांची टीम यांचेमुळेच या कार्यक्रमास एक वेगळी ऊंची प्राप्त झाली असेही आवर्जून सांगितले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने नट सम्राट निळू फुले यांचे नावे उभारलेले सुंदर नाट्यगृह गुणी कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना उपलब्ध करून देऊन आपला सांस्कृतिक वारसा जपला असेही ते म्हणाले. त्यांनी पालिका उपायुक्त श्री मिनिनाथ दंडवते यांचे आभार मानले.

उपस्थित प्रमुख अतिथी, वाद्य-वृंद यांचा सत्कार या तीनही मुलींचे आजी-आजोबांचे हस्ते करून आयोजकांनी आदर भावनेचा एक वस्तूपाठच दाखवून दिला. महाराष्ट्रातील प्रतिथयश निवेदिका सुश्री स्नेहल दामले यांनी ओघवत्या वाणीतून कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले