अमोरिकेची मनमानी, रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर ५०० टक्के पर्यंत शुल्क

0
6

दि . ४ ( पीसीबी ) – अमेरिकेत एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटले आहे की, अमेरिकन सिनेटमध्ये एक प्रस्तावित विधेयक सादर करण्यात आले आहे, ज्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. या विधेयकानुसार, रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर 500% पर्यंतचे शुल्क लादले जाऊ शकते. यामध्ये भारत आणि चीनचा देखील समावेश आहे.

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ग्राहम म्हणाले की, “जर तुम्ही रशियाकडून वस्तू खरेदी करत असाल आणि युक्रेनला मदत करत नसाल, तर तुमच्या उत्पादनांवर अमेरिकेत 500% शुल्क आकारले जाईल.” त्यांनी आरोप केला की, भारत आणि चीन एकत्रितपणे व्लादिमीर पुतिन यांचे 70% तेल खरेदी करत आहेत आणि हे तेल त्यांचे युद्धयंत्र जिवंत ठेवत आहे.

भारत आणि चीनवर होईल याचा मोठा परिणाम
हे विधेयक ऑगस्टमध्ये अमेरिकन सिनेटमध्ये मांडले जाऊ शकते. जर हे विधेयक मंजूर झाले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनवर होईल. भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे आणि युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्षात रशियाकडून सुमारे 49 अब्ज युरो किमतीचे तेल आयात केले आहे. पूर्वी, भारत प्रामुख्याने मध्य पूर्वेकडून तेल आयात करत असे, परंतु फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, त्यांनी रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे.

‘या’ सेवांना असेल सर्वधिक धोका
जर अमेरिकेने हे विधेयक मंजूर केले तर त्याचा परिणाम केवळ तेलपुरता मर्यादित राहणार नाही. अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या भारतातील औषधे, वस्त्रोद्योग आणि आयटी सेवांवरही मोठे शुल्क लादले जाऊ शकते. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि रोजगारावर होईल.