उत्तर कॅलिफोर्निया, दि. 06 (पीसीबी) : अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जोरदार भूकंप झाला आहे. उत्तर कॅलिफोर्नियाच्या फर्नडेलमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपानंतर त्सुनामी येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यूनाइटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, फर्नडेलमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. युएसजीएसच्या मते या भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे १० किलोमीटर (६.२१ मैल) आत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10.44 मिनिटांनी पॅसिफिक समुद्राच्या किनारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या हम्बोल्ट काऊंटी या ठिकाणी असलेल्या फर्नडेल नावाच्या एका लहान शहरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी फर्नडेल शहरात असलेल्या इमारतींना हादरा बसला. यावेळी भूकंपामुळे अनेक घरही गदागदा हलू लागली. हा भूकंप 7.0 ते 7.3 रिश्टर स्केलचा असून या भूकंपाचे केंद्रबिंदू फर्नडेलपासून जवळपास 100 किमी पश्चिम ते दक्षिण पश्चिमेला 10 किमी (6.21 मैल) खोलवर असल्याचे आढळले. या भूकंपाची तीव्रता पाहता या ठिकाणी त्सुनामी येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भूकंपामुळे सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलंडदरम्यान समुद्रातून जाणारा भुयारी मार्गही बंद करण्यात आला. या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील एक व्हिडीओत भूकंपामुळे काही घर हलताना दिसत आहेत. तर स्विमिंग पूलमधील पाणीही बाहेर येताना पाहायला मिळत आहे. तसेच विविध दुकानं घर यातील वस्तूंची पडझड होत असल्याचे दिसत आहे. तसेच या भूकंपामुळे नागरिक घाबरले असून त्यांच्या किंचाळण्याचा आवाजही व्हिडीओत ऐकायला मिळत आहे.
उत्तर कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या या तीव्र भूकंपानंतर समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटांची निर्मिती होताना सध्या तरी दिसत नाही. पण तरीही सर्तकतेचा इशारा म्हणून किनारपट्टी भागात राहणाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. सध्या हा इशारा मागे घेण्यात आला असला, तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यासोबतच यंत्रणांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.