नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्स १४५० अंकांनी कोसळला. तर निफ्टीचा निर्देशांक १५,८०० च्या खाली आला. परिणामी गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आता रुपयाचे मूल्य एका डॉलरसाठी ७८ रुपये पर्यंत घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत चिंता जनक परिस्थिती आहे.
दरम्यान, आगामी काळात अमेरिकेत महामंदी येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे.
१९८१ पासून ग्राहक किंमत निर्देशांकात सर्वात मोठी वाढ झाली आहे. सध्या सेन्सेक्समध्ये १४५० अंकांची घसरण असून तो ५२,८५० पातळीवर स्थिरावला. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सुमारे ४०० अंकांनी घसरून १५,८०० च्या पातळीवर सोमवारी सकाळी आला. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक २.५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आयटी निर्देशांकमध्ये सुमारे ३ टक्क्यांनी, वाहन निर्देशांकमध्ये सुमारे २ टक्के आणि रियल्टी निर्देशांक २.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बजाज ट्विन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंडिया बँक, कोटक बँक, एचडीएफसी आणि INFY या कंपन्यांचा समावेश आहे.
निर्देशांकातील घसरणीचे कारण
देशात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक कोसळले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य, खनिज तेलाचे वाढते दर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे निर्देशांकातील घसरण अधिक वाढली.