अमेरिका-इराणची इस्लामाबादमधील चर्चा फेल

0
2

दि.१२(पीसीबी) -अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेली 21 तासांची महत्त्वपूर्ण चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता यजमान राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना, दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तान आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इशाक दार यांनी सांगितले की, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील संवाद सुलभ करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. “सध्या लागू असलेला ‘सीजफायर’ (युद्धविराम) पुढे वाढवण्यात यावा, जेणेकरून भविष्यातील चर्चेसाठी पोषक वातावरण कायम राहील, ही पाकिस्तानची मुख्य इच्छा आहे,” असे दार यांनी नमूद केले. तसेच, दोन्ही देशांनी संयम पाळावा आणि सीजफायरचे उल्लंघन करू नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या चर्चेत कोणताही निष्कर्ष न निघण्यामागे अमेरिकेने ठेवलेल्या अत्यंत कडक अटी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने इराणसमोर दोन मुख्य मागण्या ठेवल्या होत्या. 1. झिरो एनरिचमेंट (Zero Enrichment): इराणने युरेनियमचे संवर्धन पूर्णपणे थांबवावे.
2. साठा देशाबाहेर पाठवणे: इराणकडे असलेला सुमारे 900 पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर हलवण्यात यावा.

चर्चेतील दुसरा मोठा वादाचा मुद्दा म्हणजे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ . जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या समुद्री मार्गाच्या सुरक्षेचे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहावे, अशी अट अमेरिकेने घातली होती. या अटींवर इराणने तीव्र आक्षेप घेतल्याने कोणतीही तडजोड होऊ शकली नाही.

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील 40 दिवसांच्या युद्धावर 15 दिवसांचा सीजफायर लागू झाला मात्र, चर्चेत तोडगा न निघाल्याने हा युद्धविराम जास्त काळ टिकणार नाही, अशी भीती जागतिक राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान अद्यापही मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असला तरी, अमेरिका आणि इराणमधील अविश्वासाची दरी रुंदावल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.