अमीर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’ ला मिळेना ओटीटी प्लॅटफॉर्म…?

0
249

मुंबई, दि. २२ (पीसीबी)- आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू न शकल्याने निर्मात्यांची निराशा झाली. या चित्रपटाद्वारे आमिर खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. एकीकडे सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होत असतानाच आता नेटफ्लिक्सनेही या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यास नकार दिला असल्याचं कळतंय. आमिरच्या या चित्रपटासोबतचा करार त्यांनी रद्द केल्याची माहिती समोर येतेय. गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. विशेषत: कोरोनानंतर OTT चा ट्रेंड गेल्या काही वर्षांत खूप वाढला आहे. आता चित्रपट निर्माते प्रथम त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करतात आणि काही काळानंतर ते ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे निर्मातेही असंच काही करण्याचा प्रयत्न करत होते, पण नेटफ्लिक्सने हा करार रद्द केला आहे.

नेटफ्लिक्सने आमिर खानसोबतचा करार रद्द केल्याचं समजतंय. आमिर खान आणि वायकॉमला ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल अधिकारांसाठी सुमारे 200 कोटी रुपये हवे होते. यासोबतच आमिर खानने नेटफ्लिक्सकडे थिएटर आणि ओटीटी रिलीजमध्ये तीन महिन्यांचं अंतर ठेवण्याची मागणीही केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कामगिरी न केल्याने नेटफ्लिक्सला आता या चित्रपटात रस राहिलेला नाही आणि यामुळेच त्यांनी हा करार रद्द केल्याचं कळतंय.

नेटफ्लिक्ससोबतचा करार रद्द केल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की, कोणताही OTT प्लॅटफॉर्म हा चित्रपट विकत घेऊ इच्छित नाही. प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मने हात वर केले आहेत. आमिर खानच्या चित्रपटाने आतापर्यंत 11 दिवसांत केवळ 55.89 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता हा चित्रपट येत्या काही दिवसांत सर्वच चित्रपटगृहांतून गायब होईल असं दिसतंय. लाल सिंग चड्ढा हा फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.