अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी, आता पिंपरी चिंचवडचे आयुक्त बदलाची चर्चा

0
353

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या झाल्या आहेत. गृह विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार डीसीपी दर्जाच्या 63 अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती देऊन नवीन पदे देण्यात आली आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर रवींद्रकुमार सिंगल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायक चोबे यांचीही बदली होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना होमगार्डच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. खरं तर वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला घरचा रस्ता दाखवणाऱ्या अमितेश कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार असणार आहे. पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. ते 2020 पासून नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पदभार सांभाळतील. त्यांची होमगार्डचे महासमादेशक म्हणून बढती झाली आहे.

राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. ते या आधी 2007 मधील एका प्रकरणामुळे चर्चेत आले होते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू असताना कॅरेबियन खेळाडू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहीमचा हस्तक मनोज कोचर यांच्यातील संवाद व्हायरल झाला होता.

अमितेश कुमार यांची या कामगिरीमुळे सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यांनी नागपूरशिवाय छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही कारभार सांभाळला आहे. नागपूरचा कारभार सांभाळण्याआधी ते राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त होते.

दरम्यान, पुण्याच्या पोलीस सह आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या आधी कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते. तर, पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक करण्यात आले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये सहआयुक्त म्हणून निसार तांबोळी यांची नियुक्ती झाली आहे.

काही अधिकाऱ्यांची बदली तर काही अधिकाऱ्यांना बढतीचा फायदा झाला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती झाली आहे. तसेच होमगार्डचे पोलीस महासंचालक असलेल्या प्रभात कुमार यांना नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्याचे संचालक बनवण्यात आले आहे. इतरही अधिकाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे बढती मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पोलिस आयुक्त विनायक चोबे यांचीसुध्दा येत्या आठवड्यात बदली होणार असल्याचे सांगण्यात आले.