अमली पदार्थ विरोधी पथकाचा चाकण, शिरगाव मध्ये दारू भट्ट्यांवर छापा

0
62

चिंचवड, दि. 11 (पीसीबी)

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्ट्यांवर छापे मारले. दोन्ही कारवयांमध्ये सात लाख 35 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघजाई वस्ती, साबळेवाडी येथे कारवाई करण्यात आली. डोंगराच्या कडेला असलेल्या ओढ्यालगत झाडाझुडपात एका व्यक्तीने दारूभट्टी लावली होती. यावर कारवाई करून पोलिसांनी तीन लाख 85 हजार रुपये किमतीचे 11000 लिटर रसायन नष्ट केले. याप्रकरणी किरण सुरेश राठोड (रा. नानेकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर एका व्यक्तीने दारूभट्टी लावली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तीन लाख 50 हजार पाचशे रुपये किमतीचे दहा हजार लिटर रसायन नष्ट केले. याप्रकरणी निलेश ज्ञानेश्वर पवार (वय 32, रा. शिरगाव, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.