रावेत, दि. 08 (पीसीबी)
तुमच्या नावाने सिंगापूरला अमली पदार्थ असलेले पार्सल पाठवण्यात आले आहे, असे सांगत संगणक अभियंत्याची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत रावेत येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.
मनोज नारायण पांडे (वय 37, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी मनोज पांडे यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. मनोज पांडे यांच्या नावाने मुंबई येथून सिंगापूर येथे एमडीएमए नावाचे अमली पदार्थ पाठवले आहेत, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी मनोज पांडे यांच्याकडून सहा लाख 99 हजार 996 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.