लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांनी शक्तप्रदर्शन करत अर्ज भरले. त्यावेळी आपापल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा झाल्या. यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यात अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंसाठी घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी, भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.
संजय राऊत म्हणाले, 56 इंच छाती सांगणारे फक्त दुबळ्या पाकिस्तानवर आग पाखडत असतात. मात्र चीनच्या कुरापतींवर अवाक्षरही बोलत नाहीत. त्यांना भिती असल्यानेच शिवसेना फोडली, शरद पवारांची भिती असल्यानेच राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसची भिती असल्याने त्यांच्यावर खोटी कारवाई केली. ते 56 इंच छाती घेऊन मणिपूरला गेले नाहीत. लखाडला जात नाहीत. आमची लढाई गुजरातशी नसून मोदी-शाह यांच्याशी असल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.
अमरावतीची लढाई ही मोदीविरोधात असल्याचे सांगताना राऊतांनी नवनीत राणांबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. राणांबाबत उच्चारलेल्या शब्दांमुळे महायुती राऊतांवर तुटून पडण्याची शक्यता.
या वेळेला पंजा, तुतारी मशालपेक्षा देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे. शिवसेनेने कधी पंजाला वगैरे मागितले नाही ठीक आहे. मात्र इतके वर्षे कमळाबाईला मत मागितले तिने काय दिवे लावले. इतकी वर्षे कमलाबाई-कमळाबाई केले ती झाली का आमची, अशी शब्दांत खासदार राऊतांनी भाजपचा समाचार घेतला आहे









































