अमरनाथ दुर्घटनेत वडगाव बुद्रुक येथील महिलेचा मृत्यू; 50 जण गेले आहेत यात्रेला

0
215

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – अमरनाथ येथील दुर्घटनेत पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सुनीता भोसले या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, आळंदी येथील अजय सोनवने महाराज यांच्या बरोबर एका बसमधून 50 भाविक यात्रेसाठी गेले आहेत. त्यातील 42 जणांशी संपर्क झाला आहे. 8 जणांशी संपर्क होत नसल्याचे कळत आहे.

अमरनाथ यात्रेला 30 जूनला सुरुवात झाली आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. अमरनाथमध्ये 10 ते 12 हजार भाविक आहेत. अमरनाथच्या गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या अमरनाथ यात्रेसाठी आळंदी येथील अजय सोनूने महाराज यांच्या बरोबर एका बसमधून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. त्यात पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील महेश भोसले, सुनीता भोसले हे पती-पत्नी आणि महेश भोसले यांची एक बहीण हे यात्रेसाठी गेले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर भोसले कुटूंबियांनी पुण्यात घरी असलेल्या आपल्या स्वप्नील भोसले या मुलाला व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल केला. सर्वजण त्याचाशी बोलले. आमचे दर्शन झाले असून आम्ही आता खाली उतरत आहोत, असे सांगितले. बोलणे झाल्याच्या 15 मिनिटानंतर वडिलांनी मुलाला फोन केला आणि आई आपल्यात राहिली नसल्याचे सांगितले. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.