मुंबई, दि. ५ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत होते.
“महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळ्या ठिकाणी भाजपाचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करत असेल तर, आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असं माना. अभी नही तो कभी नही, आता केवळ एकच लक्ष मुंबई महानगरपालिका आहे,” असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
“शिवसेनेवर जनतेचा रोष”
आपल्या ‘मिशन मुंबई’साठी सर्वांचचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे. वॉर्ड रचना, प्रभाग रचना याचा विचार करुन चालणार नाही, पदाधिकाऱ्यांनी काम करत रहावे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जनेतचा रोष आहे,” असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ”
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे,” असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला.