अभिषेक घोसाळकर हत्येनंतर सरकारला जाग, म्हणे आता पिस्तुल परवाने तपासणार

0
249

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – राज्यात सध्या धक्कादायक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आता अजून एक प्रकार घडला आहे. काल (8 फेब्रुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

विरोधकांनी कायदा-सुव्यसवस्थेवरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरलं आहे. स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्याचा बिहार झालाय का?, असा सवाल केला जात आहे.

या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या खूप गंभीर घटना आहेत. त्यामुळे सरकारला असे प्रकार रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यातच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काही महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेल्या असल्याचं बोललं जातंय. ज्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यांना बोलवण्यात येईल आणि त्यांची चौकशी केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेतला गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान, अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांकडून कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉरिस नरोना विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली आहेत. ही परदेशी बनावटीची पिस्तूल असल्याचं म्हटलं जात आहे.