पिंपरी, दि. १५ :- भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे जगातील उत्कृष्ट अभियंत्यांपैकी एक होते. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये तसेच देशात इंजिनीअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया उभारण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या महान कार्याची प्रेरणा घेऊन आजच्या अभियंत्यांनी कला, कौशल्य आणि निपुण ज्ञानाच्या माध्यमातून शहराला तसेच देशाला आकार देण्याचे काम करावे आणि यशाचे नवे शिखर गाठावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या अभिवादन प्रसंगी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल भागवाणी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रशेखर कुर्ले, चंद्रकांत मोरे तसेच सुनील बेळगावकर, संतोष कुदळे,चंद्रकांत कुंभार, अभिमान भोसले, धनाजी नखाते, विजय कांबळे, संदीप खोत, सचिन मगर, अमरजीत मस्के, संदीप वाडीले, बिपिन थोरमोटे, अमोल शेलार, महेंद्र देवरे, विनय जगताप, शरद सानप,महिला अभियंता दिपाली धेडे आणि विविध विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते, त्यांनी आधुनिक भारताच्या अभियांत्रिकी घडामोडीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात व्यापक सहभाग आहे. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच दरवर्षी १५ सप्टेंबर हा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.