मुंबई , दि.: १२(पीसीबी) अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. माधुरीच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी याबद्दलची माहिती दिली. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर माधुरीनेही अंत्यसंस्काराबाबतचा संदेश दिला आहे. ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षितचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील वरळी इथल्या स्मशानभूमीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, असं तिने लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या सासूंसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. सोशल मीडियावर त्यांनी दोन कपचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या 90 वर्षीय सासूंनी केलेली ही पेंटिंग. त्यांना मॅक्युलर डिजनरेशन असून त्या नीट पाहूसुद्धा शकत नाहीत. मात्र त्यांच्या मनातून जे बाहेर येतं ते उल्लेखनीय आहे. ती जगातील सर्वांत सुंदर आणि सकारात्मक व्यक्ती आहे. तिच्या प्रतिभेची आठवण म्हणून आम्ही तिचे पेटिंग कपवर छापून घेतले आहेत.’