अभिनेत्री कंगणा राणावत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज

0
185

देश, दि. २१ (पीसीबी) – आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगणा राणावत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाली आहे. कंगणा राणावतची भाजपसोबत वाढत असलेली जवळीक पाहता ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता यावर थेट शिक्कामोर्तब झालं आहे.

कंगणा निवडणूक लढवणार असल्याचं स्वतः तिचे वडील अमरदीप राणावत यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय ती फक्त आणि फक्त भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवेल, असं देखील तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.

अमरदीप राणावत यांनी कंगणा भाजपच्या तिकीटावरच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, मात्र ती कोणत्या जागेवरुन निवडणूक लढणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. यावर बोलताना ते म्हणाले की, कंगणा कुठून निवडणूक लढवणार याचा निर्णय भाजप घेईल.”

कंगणा राणावत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्वतः तीने देखील कबूल केलं आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या द्वारका येथे बोलताना तीने याबद्दल सूचक वक्तव्य केलं होतं.

देवाची कृपा असेल तर मी नक्की निवडणूक लढवेन, असं कंगणा राणावत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर कंगणा राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला होता. आता तिच्या वडिलांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कंगणा कुठून लढणार ?
कंगणा राणावतने नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती, त्यानंतर ती कुठून निवडणूक लढणार या चर्चांना वेग आला होता. सध्याच्या माहितीनूसार कंगणाला तीचं राज्य हिमाचल प्रदेशमधून तिकीट मिळू शकतं. गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच चंदीगड या राज्यांमधूनही तिला तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.