अबब… विश्रांतवाडीतून साडेतीन कोटींचे मेफेड्रोन जप्त

0
232

पुणे, दि. १९ (पीसीबी) – ससून रुग्णालयाच्या परिसरातून ललित पाटील आणि साथीदारांकडून सव्वा दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ (मेफेड्रोन) जप्त करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा तस्करी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी विश्रांतवाडीमधील गोदामात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे मेफेड्रोन पोलिसांनी हस्तगत केले आहे.

वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विक्रीत आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्या मागावर गुन्हे शाखेची पथके असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यावेळी उपस्थित होते.

माने आणि शेख हे सरार्इत गुन्हेगार आहे. माने आणि करोसिया हे सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात थांबले असून ते अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस शिपाई विठ्ठल साळुंके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून माने आणि करोसिया यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा विश्रांतवाडीतील हैदर शेखने त्यांना मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली. शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक बाबर, गायकवाड, उपनिरीक्षक रमेश तापकीर, विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, नीलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, अय्यज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी ही कारवाई केली. या कारवार्इबद्दल गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

गोदामात आणखी मेफेड्रोन असल्याची शक्यता –
शेखने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन ठेवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. शेखकडून एक कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम जप्त करण्यात आले. तर त्याने मिठाच्या गोदामात एका पोत्यात मेफेड्रोन लपवून ठेवले होते. त्या गोदामातून दीड कोटी रुपयांचे ७५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. गोदामात मिठाची आणखी पोती आहेत. त्या पोत्यांमध्ये मेफेड्रोन ठेवल्याची शक्यता असून, पोत्यांची तपासणी करण्यात येत आहे.

माने आणि शेखची कारागृहात ओळख –

मानेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे ३६ गुन्हे दाखल आहेत. तर शेखवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. येरवडा कारागृहात दोघांची ओळख झाली होती. माने आणि शेख गेल्या वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले. तेव्हापासून दोघांनी अमली पदार्थ विक्री सुरू केली होती. शेख आणि माने मुंबईतील अमली पदार्थ तस्कर सॅम आणि ब्राऊन यांना देणार होते. सॅम आणि ब्राऊन परदेशी नागरिक आहेत. ते मुंबईत मेफेड्रोनची विक्री करणार होते, असे चौकशीत उघड झाले आहे.